‘स्थानिकांच्या हिताला प्राधान्य नसेल तर असा विकास नको’; राज ठाकरेंचा सरकारला घणाघात


मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सवाल; ‘तिसरी मुंबई’ आणि कोकणातील जमीन व्यवहारांवरही निशाणा


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात कोकणातील विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प तसेच कोकणातील जमीन व्यवहारांवरून सरकारला सवाल उपस्थित केले. विकासाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना स्थानिकांच्या हिताला प्राधान्य नसेल तर अशा विकासाचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यावरून सरकारला सवाल

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या विलंबामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे सांगितले होते. मात्र, कंत्राटदार नेमके का कंटाळले, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

गेल्या १५ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात काम रखडलेलेच असल्याची टीका त्यांनी केली. महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने सण-उत्सवांच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘आमच्या जमिनी, पाणी आणि विजेवर बाहेरचे पोसले जाणार असतील तर विकासाचा उपयोग काय?’

कोकणातील विकास प्रकल्पांबाबत भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला. ‘आमच्या जमिनी, आमचे पाणी आणि आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील, तर या विकासाचा उपयोग काय?’ असा थेट सवाल त्यांनी केला.

सरकारची पहिली जबाबदारी आपल्या नागरिकांचे हित पाहण्याची आहे. स्थानिकांच्या हितापेक्षा राजकीय पदांवरील वादांना महत्त्व देणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तिसऱ्या मुंबई’बाबत स्थानिकांना माहिती आहे का?

कोकणात प्रस्तावित असलेल्या ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पावरूनही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पामुळे परिसरात मोठे बदल होणार असतील, तर स्थानिक नागरिकांना आणि विशेषतः तरुण-तरुणींना त्याची पुरेशी माहिती दिली जात आहे का, असा सवाल त्यांनी केला.

बाहेरील लोकांना महाराष्ट्रात भविष्यात कुठे आणि कोणते प्रकल्प येणार आहेत, याची माहिती मिळते आणि त्यानुसार ते नियोजन करतात. मात्र, स्थानिक तरुणांना याची माहिती नसते, असा दावा त्यांनी केला.

जमीन व्यवहारांवरून स्थानिक नेत्यांवर आरोप

जमीन हा कोकणातील स्थानिकांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी जमिनींच्या विक्रीबाबत सावध केले. विकास प्रकल्प कुठे होणार आहेत, याची माहिती काही लोकप्रतिनिधींना आधीच मिळते आणि त्यानंतर त्या भागातील जमिनींचे व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यासह काही स्थानिक नेत्यांचा उल्लेख करत जमीन व्यवहारांबाबत गंभीर आरोप केले. ‘कुठे विकास होणार आहे, हे आमदारांना आधीच माहीत असते,’ असा दावा करत काही लोकप्रतिनिधी आधी स्वस्त दरात जमिनी खरेदी करतात आणि त्यानंतर त्या मोठ्या उद्योगपतींना विकतात, असा आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील विकास प्रकल्प, मुंबई-गोवा महामार्ग, जमीन व्यवहार आणि प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button