पोलिस पाटीलांच्या प्रलंबित मागण्यांवर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश


राजापूर : महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील महासंघाने पोलिस पाटीलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. पोलिस पाटीलांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत योग्य तो अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलिस पाटीलांच्या सेवा अटी, मानधन, सुविधा आणि अन्य मागण्यांवर निर्णय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील महासंघाचे राज्याध्यक्ष मोहनराव शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पाटीलांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या मागण्या शासन दरबारी प्रलंबित राहिल्याने महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महासंघाच्या वतीने अ‍ॅड. एम. व्ही. भोसले यांनी बाजू मांडली, तर राज्य शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी के. एस. गायकवाड यांनी युक्तिवाद केला.
सुनावणीदरम्यान महासंघाच्या वतीने गृह विभागाच्या २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीकडे पोलिस पाटीलांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याचे न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच या मागण्यांवर विचार करताना मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायाधिकरणाने पोलिस पाटीलांशी संबंधित सर्व प्रस्ताव व निवेदने २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर विचारार्थ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समितीने आपल्या शिफारशी निश्चित कालावधीत शासनाकडे सादर कराव्यात आणि त्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांच्या आत अंतिम निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
या निर्णयामुळे पोलिस पाटीलांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेवा अटी, मानधन, सुविधा आणि अन्य मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. पोलिस पाटील महासंघाच्या पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पुजारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button