‘कोकणात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत’; ॲड. वैभव खेडेकर यांचा दावा

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बऱ्याच दिवसांनंतर कोकण दौऱ्यावर येत असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी होणाऱ्या त्यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या महामार्गाच्या पाहणीसाठी राज ठाकरे येत आहेत, त्याचे सुमारे ९५ ते ९७ टक्के काम पूर्ण झाले असून, त्यामुळे पाहणीदरम्यान फार मोठ्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास येतील असे वाटत नाही, असे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचा मुख्य परिणाम महामार्गाच्या पाहणीपेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने होऊ शकतो, असेही खेडेकर यांनी नमूद केले.

‘कोकणाकडे झालेले दुर्लक्ष आणि नेतृत्वाची कमकुवत वरची फळी यामुळे पक्षांतरांना चालना’

आपल्या भाजपा प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेल्याचा उल्लेख करत ॲड. खेडेकर म्हणाले की, काहीजण भाजपमध्ये आले, तर काही शिंदे सेनेत आणि काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. कोकणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पक्षांच्या वरच्या फळीतील कमकुवत नेतृत्व यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही महामार्गाच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या माध्यमातून जागर यात्रा काढली होती. मात्र, त्यावेळी अपेक्षित परिणाम दिसून आला नसल्याचेही खेडेकर यांनी म्हटले.

महाबळेश्वरच्या शिबिरावरून खेडेकरांचे सूचक भाष्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आम. भास्कर जाधव यांच्या महाबळेश्वर येथील शिबिराबाबतही ॲड. वैभव खेडेकर यांनी सूचक भाष्य केले. भास्कर जाधव हे चळवळीतील कार्यकर्ते असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. महाबळेश्वरमध्ये सुरू असलेले हे शिबिर कदाचित कोकणातील पारंपरिक सामूहिक मेळाव्यासारखे असू शकते, असे त्यांनी म्हटले.
मात्र, महाबळेश्वरची भूमी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची साक्षीदार ठरली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनाचा संदर्भ देत त्यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी झालेली नियुक्ती आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख केला.
तसेच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीचाही संदर्भ देत, या भूमीवरून यापूर्वीही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘२०२९ पर्यंत अनेक स्थित्यंतरे होणार’

‘भास्करशेठ महाबळेश्वरहून क्रांतीची मशाल घेऊन येतात की नाही, हे पाहावे लागेल,’ असे सूचक विधान करत ॲड. खेडेकर यांनी कोकणातील आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. कोकणाने यापूर्वी अनेक राजकीय भूकंप आणि स्थित्यंतरे पाहिली असून, २०२९ पर्यंतही अनेक राजकीय बदल घडण्याची शक्यता आहे, असा दावा त्यांनी केला.
त्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत, कोकणात पुन्हा मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत मिळत असल्याचे ॲड. वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button