
कोंढेतड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; पाड्यावर हल्ला करून ठार
वनविभागाकडून पिंजरा लावण्याचे आश्वासन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राजापूर : शहरातील कोंढेतड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी वनविभागाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे.
गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री बिबट्याने कोंढेतड परिसरातील रहाटे यांच्या घराशेजारी असलेल्या एका पाड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अजीम जैतापकर यांनी पुन्हा वनविभागाशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर वनविभागाने शुक्रवारी या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जैतापकर यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.




