
कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याच्या प्रस्तावाने कोकणात चिंतेचे वातावरण, कोकणातील शेती व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार
कोयना जलविद्युत प्रकमातून वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे पाणी मुबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होताच कोकणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रस्तावामुळे वाशिष्ठी नदीचा बारमाही प्रवाह, नदीतील मत्स्यसंपदा, भूजल पातळी, शेती, पिण्याचा पाणीपुरवठा आणि नदीपात्रातील पर्यावरणीय संतुलन यावर काय परिणाम होणार, याबाबत नागरिक, शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि पर्यावरण अभ्यासकानी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सखोल अभ्यास केल्याशिवाय याबाबत शासनाने निर्णय घेऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाणारे पाणी गेल्या अनेक दशकांपासून नदीच्या प्रवाहाला आधार देत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे पाणी मुंबईकडे वळविल्यास नदीतील बारमाही हात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होऊन संपूर्ण नदी परिसंस्थेवर त्याचे दूरगष्मी परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
वाशिष्ठी नदीवर हजारो नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय आणि विविध लघुउद्योगासाठी या नदीचा वापर केला जातो. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास स्थानिक जलस्रोतांवर ताण वाढू शकतो. विशेषतः ऊन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिका तीव्र होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी राहाते. खेडीं, गाणे-खडपोली, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला याच नदीतून २५ एमएलडी पाणी उचलले जाते, चिपळूण नगरपालिका १० एमएलडी पाणी उचलते. त्याशिवाय स्थानिक ग्रामपंचायतीसुद्धा वाशिष्ठी नदीतून कोयनेचे पाणी उचलतात.




