जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना’ उत्स्फूर्त प्रतिसाद; १५ हजार नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ


​रत्नागिरी, दि. ४ ): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना” नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महिनाभरात संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे २०० शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यातून जवळपास १५ हजार नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आली आहे.
​मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयाने, तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या महाशिबिरांचे यशस्वी नियोजन करण्यात आले.
​मोफत आरोग्य तपासणी आणि विविध सेवा
​या शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश होता:
​पूर्ण शरीर तपासणी, महत्त्वाच्या रक्तचाचण्या, ईसीजी (ECG) आणि BMI तपासणी.
​हाडे, मेंदू आणि मणक्यांच्या आजारांबाबत विशेष तपासणी.
​कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, मधुमेह आणि पायाच्या आजारांबाबत समुपदेशन.
​लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया.
​गर्भावस्थेतील तपासण्या, समुपदेशन आणि लसीकरण.
​लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबत जनजागृती व तपासणी.
​मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया.
​शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आभा कार्ड (ABHA) आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी.
​याशिवाय, विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून ३५० हून अधिक रक्तपिशव्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले.
​खासगी रुग्णालयांचा भरीव सहभाग
​जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षेशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयांनी या शिबिरांमध्ये मोठा वाटा उचलला:
​बी. के. एल. वालावलकर रुग्णालय (सावर्डे): लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया आणि मूळव्याध-भगंदर आजारांवर मोफत लेसर शस्त्रक्रियांचे यशस्वी आयोजन.
​चिरायू हॉस्पिटल (रत्नागिरी): तपासणी केलेल्या रुग्णांना MRI, CT-SCAN सारख्या महागड्या चाचण्यांसाठी ५०% सूट देणारे कूपन आणि मोफत मार्गदर्शन.
​श्री. रामनाथ हॉस्पिटल (रत्नागिरी): मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत ECG सेवा.
​परकार हॉस्पिटल (रत्नागिरी): दामले विद्यालय आणि ग्लोबल मराठा मंदिर हायस्कूल येथे शालेय आरोग्य तपासणी.
​तसेच श्री. स्वामी समर्थ हॉस्पिटल (साटवली), श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, श्रीमाता जिजाऊ संस्था, नंदादीप आय हॉस्पिटल, लोकमान्य बाळगंगाधर टिळक हॉस्पिटल (रत्नागिरी), आणि खेड व चिपळूण येथील लाइफ केअर, SMS, अपरांत, घरडा, परशुराम, श्री हॉस्पिटल या रुग्णालयांनी शिबिरांच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
​शासकीय यंत्रणेचे मोलाचे सहकार्य
​जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, NCD कार्यक्रमप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालय, रक्तपेढी आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे पार पडली.
​ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत, समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे, लिपिक अमित कोरगांवकर व समन्वयक राजेश आंबेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button