
चिपळूण उड्डाणपुलाचा अखेरचा गर्डर चढला
मुंबई-गोवा आणि गुहागर- विजापूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रारंभीपासून रडतखडत सुरु झालेल्या या पुलाचा १६ ऑक्टोबर २०२३ रोजी काही भाग कोसळल्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार मूळ आराखड्यात बदल करण्यात आला. ४० मीटरचे गाळे कमी करून २० मीटर अंतरावर पिलर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त पिलर उभारावे लागले आणि काम काही काळ रखडले. मात्र वर्षभरापासून या पुलासाठी महामार्ग कंत्राटदार ईगल इन्फ्रा कंपनीकडून स्वतंत्र कंत्राटदार नेमून कामाला नव्याने गती देण्यात आली.
चिपळूण शहराच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा महामार्गाच्या चौपदरीकरणातील १.८४० कि.मी. लांबीचा व २५ मीटर रुंदीचा भव्य उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरच्या टप्प्यातील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या उड्डाणपुलासाठी ९६ पिलर उभारण्यात आले असून त्यावर सर्व ७२८ गर्डर बसवण्यात आले आहेत. पुलावरील १८२ स्लॅबपैकी १७२ स्लॅबचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार पुढील पंधरा दिवसांत पुलावरील मुख्य बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.




