आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; गुहागरमध्ये चंदन वृक्षारोपण

गुहागर. दि, ३० जुलै, २०२६ : दुर्गादेवी देवस्थान फंड, वरचा पाट, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यांच्या वतीने भाजपा नेते, माजी वनमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा चंदन वृक्ष लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव जपत देवस्थान परिसरात चंदनाच्या वृक्षाची लागवड करून त्यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून कार्यरत असताना राज्यात वृक्षलागवड, वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. पर्यावरण संरक्षणाच्या त्यांच्या कार्याला मानवंदना देत त्यांच्या वाढदिवसानिमित्त चंदन वृक्षाची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद (किरण) खरे, सचिव संतोष मावळणकर, अमोद गोळे तसेच देवस्थानाच्या पाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षांचे संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रोच्चार आणि आशीर्वाद मंत्रांचे पठण करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरंतर जनसेवेची ऊर्जा आणि यश लाभावे, अशी प्रार्थना केली. मंत्रोच्चारामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यावेळी उपस्थितांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक, पर्यावरणपूरक आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पर्यावरण संवर्धन, अध्यात्म आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button