आगीत बाधित कुटुंबाला मदतीचा हात; पाच म्हशींचे वाटप करून दिला आर्थिक आधार

खेड : खेड तालुक्यातील रझवेल गावात काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत जनावरांच्या वाड्याला आग लागून सुमारे २० जनावरे मृत्युमुखी पडली होती. या दुर्घटनेत शेतकरी महमूद हमदुले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला होता.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक बशीरभाई हजवानी यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध स्तरावर सहकार्य उभे करत बाधित कुटुंबाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या मदतीचा एक भाग म्हणून हमदुले कुटुंबाला पाच म्हशींचे वाटप करण्यात आले. त्यापैकी तीन म्हशी समाजसेवक बशीरभाई हजवानी यांनी तर दोन म्हशी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी प्रदान केल्या.
या मदतीमुळे आगीत सर्वस्व गमावलेल्या हमदुले कुटुंबाला पुन्हा उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असून आर्थिक पुनर्वसनाला मोठा हातभार लागणार आहे. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे आलेल्या दात्यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button