
E20 पेट्रोलबाबत सोशल मीडियावर नवी मोहीम; ‘१०० टक्के पेट्रोलचा पर्यायही द्या’ची मागणी
नवी दिल्ली : E20 इंधन धोरणावरून सोशल मीडियावर नव्या डिजिटल मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे. ‘E20 जनता पार्टी’ या नावाने एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या मोहिमेत ग्राहकांना E20 पेट्रोलसोबत १०० टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय पक्ष नसून नागरिकांची स्वतंत्र ऑनलाइन मोहीम असल्याचा दावा संबंधित सोशल मीडिया खात्यांवर करण्यात आला आहे. सरकारने E20 इंधन उपलब्ध ठेवावे, मात्र इथेनॉल मिश्रण नसलेले पेट्रोलही पेट्रोल पंपांवर उपलब्ध असावे आणि कोणते इंधन वापरायचे याचा निर्णय ग्राहकांवर सोडावा, अशी भूमिका या मोहिमेतून मांडली जात आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, “वाहने ही प्रयोगशाळा नाहीत. ती सामान्य नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून खरेदी केली आहेत. त्यामुळे इंधनाच्या निवडीचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळाले पाहिजे,” असे नमूद करण्यात आले आहे. वाहन उत्पादकांच्या शिफारशींनुसार इंधन उपलब्ध करून द्यावे आणि कोणत्याही प्रकारचे इंधन नागरिकांवर सक्तीने लादू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या आयोजकांचा दावा आहे की, त्यांचा उद्देश कोणत्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार करणे नसून ग्राहकांचे हक्क आणि E20 धोरणाचे परिणाम यावर सार्वजनिक चर्चा घडवून आणणे हा आहे.
दरम्यान, या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून एक्सवर सुमारे ४८ हजार, तर इन्स्टाग्रामवर १.४३ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खाते सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढल्याने या मोहिमेची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.




