आठ वर्षांची प्रतीक्षा… प्रेम जिंकले!

रत्नागिरी :

प्रेम म्हणजे केवळ सुखाचे क्षण नव्हेत, तर संकटातही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवणे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बेहेरेवाडी (ता. पावस, जि. रत्नागिरी) येथील शुभम रमाकांत चव्हाण आणि त्यांच्या जीवनसाथी गिरिजा (प्रज्योती) चव्हाण यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी.

२०१८ मध्ये झालेल्या भीषण दुचाकी अपघातात शुभम यांच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. स्पायनल कॉर्ड इन्ज्युरीमुळे मानेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला आणि ते क्वाड्राप्लेजिक झाले. एका क्षणात स्वतःचा सलून व्यवसाय सांभाळणारा, स्वप्ने पाहणारा तरुण पूर्णपणे इतरांवर अवलंबून झाला.

अपघातानंतर त्यांच्यावर कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटल आणि त्यानंतर विन्स हॉस्पिटलमध्ये डॉ. संतोष प्रभू . व रत्नागिरीमध्ये डॉक्टर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाले. मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्या काळात अंघोळ घालणे, कपडे बदलणे, जेवण भरविणे तसेच दैनंदिन सर्व कामांसाठी त्यांना आई रश्मी चव्हाण यांच्यावर अवलंबून राहावे लागले.
घरी असताना घरामध्ये फिजिओथेरपी म्हणून डॉक्टर नितीन चौके येत होते ते फिजिओथेरपी देत होते त्या काळामध्ये मग कोरोना काळात नंतर सगळं बंद झालं नंतरचा काळ हा खूप डी मोटिवेट झाला होता जगणं मुश्किल झालं होतं मग त्याच काळात शुभम चव्हाण ला त्याच्या मित्रांनी खूप मदत केली व मॅडम साक्षी साखळकर यांनी फिजिओथेरपी देऊन एवढा सक्षम केलं तो काळ मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी मला अशक्य गोष्ट शक्य करणं शिकवलं मग त्यांनी मला रेफर केल हाजी अली ला जाण्यासाठी.

यानंतर मुंबईतील हाजी अली येथे तीन महिने व पी एम टी लोणी येते सुद्धा तिन व्हिजिट पूर्ण केल्या फिजिओथेरपी घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात हळूहळू हालचाली सुरू झाल्या. पुढील अडीच वर्षे त्यांनी घरी उपचार आणि व्यायाम सुरू ठेवला. त्यानंतर मुंबईतील शरण संस्थेत दोन वर्षे राहून नियमित फिजिओथेरपी आणि व्यायाम केला. व विविध क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव घेतला व प्यारा स्पोर्ट्स खेळण्यासाठी संधी मिळाली नॅशनल पर्यंत अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. सुरुवातीला आधार घेऊन उभे राहणे, त्यानंतर काठीच्या सहाय्याने चालणे, जिने चढणे-उतरणे आणि स्वतःची दैनंदिन कामे स्वतः करणे त्यांना शक्य झाले.

कॅम्पमध्ये मिळालेली व्हीलचेअर त्यांच्या गरजेनुसार योग्य नसल्यामुळे बाहेर पडणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण जात होते. स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात असताना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी शुभम जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे गेले असता त्यांची आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी ओळख झाली. शुभम यांची परिस्थिती समजून घेत सादिक नाकाडे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे नाव निओमोशनच्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी नोंदवले.

निओमोशनची इलेक्ट्रिक व्हीलचेअर मिळाल्यानंतर शुभम यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल झाला. आता ते कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊ शकतात, स्वतःची कामे स्वतः करू शकतात आणि आत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. या सुविधेमुळे त्यांना घरून डिजिटल मार्केटिंगचे वर्क फ्रॉम होम काम करणेही शक्य झाले असून ते स्वावलंबी आयुष्य जगत आहेत.

या संघर्षमय प्रवासात त्यांच्या प्रेमाचीही परीक्षा झाली. अपघातापूर्वी शुभम यांचे प्रज्योती चव्हाण यांच्यावर प्रेम होते. अपघातानंतर आलेल्या कठीण परिस्थितीतही दोघांच्या नात्यातील विश्वास आणि प्रेम अबाधित राहिले. समाजाची बोलणी, भविष्याची अनिश्चितता आणि अनेक अडचणींवर मात करत प्रज्योती यांनी शुभमची साथ कायम ठेवली.

तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुभम आणि प्रज्योती ९ जुलै २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले. विवाहानंतर प्रज्योती यांचे नाव गिरिजा शुभम चव्हाण असे झाले. त्या सध्या मुंबईतील महेंद्र कोटक बँकेत कार्यरत असून शुभम घरून डिजिटल मार्केटिंगचे वर्क फ्रॉम होम काम करतात. सध्या हे दाम्पत्य विरार येथे आनंदी आणि समाधानी वैवाहिक जीवन जगत आहे.

शुभम यांचे वडील स्वर्गीय रमाकांत चव्हाण हे मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे अटेंडंट म्हणून कार्यरत होते. आई रश्मी चव्हाण यांनी मुलाच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. मोठी बहीण तेजस्विनी विवाहित असून धाकटी बहीण साईश्वरी MSF दलात कार्यरत आहे.

एका भीषण अपघाताने आयुष्य बदलले; पण जिद्द, कुटुंबाची साथ, उपचार आणि प्रेमाच्या बळावर शुभम चव्हाण यांनी पुन्हा स्वतःचे आयुष्य उभे केले. ही केवळ एका विवाहाची कहाणी नाही, तर प्रेम, विश्वास, संघर्ष आणि जिद्दीच्या विजयाची प्रेरणादायी गाथा आहे.

 *अपंगत्व ही शरीराची मर्यादा असू शकते, मनाची नाही; जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांमुळे कोणतीही व्यक्ती आयुष्यात मोठी झेप घेऊ शकते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button