
बोरसूत येथील कथित २५ लाखांच्या रस्ता प्रकरणाला नवे वळण
पाटबंधारे विभागाची कारवाई; अनधिकृत रस्ता हटवून चर मोकळा, इतर मुद्द्यांवर न्यायालयीन लढ्याची तयारी
देवरुख : बोरसूत येथील कथित २५ लाख रुपयांच्या रस्ता घोटाळा प्रकरणाला गुरुवारी नवे वळण मिळाले. पाटबंधारे विभागाच्या कालव्याचा चर बुजवून तसेच अनधिकृतरीत्या बांध घालून त्यावर रस्ता तयार करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष कारवाई करत संबंधित रस्ता हटवून चर मोकळा केला.
या प्रकरणात चर मोकळा करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सरपंच चेतन खामकर व त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पावसाळ्यात निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन तहसीलदार देवरुख, देवरुख पोलीस ठाणे तसेच पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. आर. मोहिते यांनी गुरुवारी (दि. २३ जुलै) घटनास्थळी कारवाई केली.
या कारवाईत पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवणारा तसेच पाटबंधारे विभागाची पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेला रस्ता हटवून कालव्याचा चर पूर्ववत मोकळा करण्यात आला. त्यामुळे परिसरातील संभाव्य पूरस्थिती, भूस्खलन आणि इतर दुर्घटनांचा धोका कमी झाल्याचे सांगण्यात येत असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये अनधिकृत कमान उभारल्याचा आरोप, शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या जमिनीतून रस्ता नेल्याचा दावा, विविध बांधकामांच्या वैधतेबाबतचे प्रश्न, ‘२३’ ची संशयित नोंद तसेच निधीच्या कथित अफरातफरीची चौकशी या बाबींचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांबाबत न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय शैलेश संसारे यांनी घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




