
रत्नागिरीतील तांदूळ रेशनवर वितरित करा, राईस मिल उभारण्याची बाळ माने यांची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यात उत्पाचित होणार्या तांदळाचेच सार्वजनिक वितरण प्रणालीत (रेशन) वितरण व्हावे, यासाठी जिल्ह्यात राईस मिल उभारण्यात याव्यात, अशी मागणी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी राज्य शासनाकडे केली. तसेच जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.
मिर्या येथे रविवारी कुटुंबासमवेत भातरोप लावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माने बोलत होते. यंदा पावसाला उशीर झाल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी पेरण्या झाल्यानंतरही पाणी उपलब्ध नसल्याने शेतक-यांना विहिरीतील पाण्यावर शेती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचीही त्यांनी व्यक्त केली.
रेशनवर सध्या इतर राज्यांतील तांदूळ वितरित केला जातो. मात्र कोकणातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील तांदूळ स्थानिक नागरिकांना रेशनवर उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने जिल्ह्यात राईस मिल उभाराव्यात. शेतकर्यांनी अतिरिक्त उत्पादन शासनाच्या धान खरेदी योजनेत विकल्यास त्यांना चांगला दर मिळेल आणि त्याच तांदळाचा लाभ स्थानिक नागरिकांनाही होईल, असे माने यांनी सांगितले.



