
रत्नागिरी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाकडून धडक कारवाया…
रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि छुप्या वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी पथकाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. अवघ्या दोन आठवड्यांत जिल्ह्यात धडक मोहिमेचे सत्र राबवत विभागाने तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत. अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या थेट नेतृत्वाखाली झालेल्या या १४ दिवसांतील धडक कारवायांमध्ये लाखी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बेकायदा दारू व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै ते १४ जुलै २०२६ या अवघ्या १४ दिवसांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी केली. या विशेष मोहिमेदरम्यान पथकाने विविध ठिकाणी छापे टाकत तब्बल ४२ गुन्हे दाखल केले आहेत, तर बेकायदा दारू व्यवसायात गुंतलेल्या ३९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व कारवायांमध्ये एकूण ३ लाख १ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.




