
“20 दिवस बघ्याची भूमिका घेतली, आता आवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच.”, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा!
Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्ली पोलीस जबरदस्तीने रुग्णालयात घेऊन गेले आहेत.
यामुळे जंतर-मंतर येथे मोठा गोंधळ उडाला असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केले आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर राजकीय प्रतिक्रियाही येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनीही यावर टिप्पणी केली आहे. 20 दिवस बघ्याची भूमिका घेतली, आता आवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले. वांगचुक यांना ताब्यात घेतले असले तरी आंदोलन सुरूच राहील, असे शरद पवार म्हणाले.
सोनम वांगचुक यांनी पाच-सहा दिवसात अटक करतील असे वाटत होते आणि तसेच झाले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी होती. त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही. याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. राजीनाम्याची मागणी होत असताना केंद्र सरकार त्याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होते, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
शेवटी त्यांच्यामागे इतर राजकीय पक्ष उभे राहिले. काँग्रेसच्या वतीने त्यांची प्रतिनिधी गेले आणि राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. 20 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले, दिल्लीत असूनही भेटायला गेले नाहीत. आता हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचे लक्षात येताच ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वांगचुक यांना ताब्यात घेतले असले तरी आंदोलन सुरू राहील, कारण त्यांची मागणी रास्त होती. हे आंदोलन पुढेही सुरू राहील आणि याच विषयाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होईल, असेही शरद पवार म्हणाले.




