‘३ इडियट्स’ मधील पात्र वांगचूक यांच्यावर आधारित नव्हतं, आमिर खानने केलं स्पष्ट; उपोषणाबद्दल म्हणाला, “यातून काहीतरी.”

: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांबरोबर २० दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला फक्त विद्यार्थ्यांचाच नाही, तर सेलिब्रिटींचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय.

‘३ इडियट्स’ चित्रपटात ‘चतुर’ची भूमिका साकारणारा अभिनेता ओमी वैद्य याने दोन दिवसांपूर्वी वांगचूक यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. तेव्हापासून या मुद्द्यावर आमिर खान आणि सिनेमातील इतर कलाकार गप्प का आहेत? असा प्रश्न उपस्थित करत होते. अखेर आमिर खानने यावर मौन सोडले आहे.

ओमी वैद्यच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमिरने स्पष्ट केलं की, ‘३ इडियट्स’ मधील मुख्य पात्र सोनम वांगचूक यांच्यावर आधारित नव्हतं. चित्रपट बनवताना आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिराणी किंवा लेखक अभिजात जोशी यांपैकी कोणालाही वांगचूक यांच्याबद्दल माहिती नव्हती, असंही त्याने सांगितलं. मात्र, त्याने वांगचूक यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत त्यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं.

‘३ इडियट्स’ सोनम वांगचूक यांच्यावर आधारित नाही – आमिर खान

‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये आमिर खानला सोनम वांगचूक आणि त्यांच्या उपोषणाबद्दल विचारण्यात आलं. आपल्या ‘३ इडियट्स’ चित्रपटातील पात्राबाबत असलेला गैरसमज दूर करताना तो म्हणाला, “नाही, ते खरं नाहीये. तो एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा चित्रपट करत होतो, तेव्हा मला सोनम वांगचूक यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. नुकताच मी चतुरचा (ओमी वैद्यचा) एक व्हिडीओ पाहिला, त्यात त्याने तसं म्हटलंय, पण तो चुकलाय. कदाचित चतुरला तसं वाटलं असेल, पण मला, राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजीतपैकी कोणालाच सोनम यांच्याबद्दल माहीत नव्हतं.”

वस्तुस्थिती सांगतोय – आमिर खान

“मला फुन्सुक वांगडूला मरताना पाहायचं नाही,” असं ओमी वैद्यने सोनम वांगचूक यांना पाठिंबा देताना म्हटलं होतं. त्यानंतर आमिरने हे स्पष्टीकरण दिलंय. आमिर खान पुढे म्हणाला, “सोनम वांगचूक अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी त्यांचं पात्र ‘३ इडियट्स’ चित्रपटातील पात्रावरच आधारित असायला हवं असं नाही.” दरम्यान, खुद्द वांगचूक यांनीही हे पात्र आपल्यावर आधारित नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. “केवळ वस्तुस्थिती सांगण्यासाठी ही गोष्ट स्पष्ट करतोय,” असंही आमिर खानने नमूद केलंय.

सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर आमिर खानची प्रतिक्रिया

बॉलीवूडच्या इतर अनेक कलाकारांप्रमाणेच आमिरनेही वांगचूक यांना त्यांचं उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. “आपल्या सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटत आहे. आम्ही आशा करतो की यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल. त्यांनी आपलं उपोषण सोडावं आणि स्वतःची काळजी घ्यावी,” असं आमिर खान म्हणाला.

दरम्यान, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज २० वा दिवस आहे. आतापर्यंत ओमी वैद्य, अतुल कुलकर्णी, शबाना आझमी, स्वानंद किरकिरे, इम्रान खान, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, फातिमा सना शेख यांनी वांगचूक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारला त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचं आवाहन केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button