
रत्नागिरी जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा घटला
रत्नागिरी जिल्ह्यात मे २०२६ मध्ये करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणात भूगर्भातील पाणीपातळीत सरासरी ०.२० मीटर (२० सेंटीमीटर) घट झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या पाच वर्षांच्या मे महिन्यातील सरासरी पाणीपातळीच्या तुलनेत यंदा पाणीपातळी खालावल्याने भविष्यात पाणीटंचाईची चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १.१२ मीटरने पाणीपातळी घटल्याची नोंद झाली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत मे २०२६ मध्ये जिल्ह्यातील ६३ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. वर्षातून चार वेळा या विहिरींच्या पाणीपातळीची नोंद केली जाते. या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत मे महिन्यात जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी ६.२३ मीटर होती. यंदा ती ६.४३ मीटर झाली आहे पाणीपातळीची खोली वाढणे म्हणजे भूगर्भातील पाणीसाठा कमी होणे होय.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील सात निरीक्षण विहिरींमध्ये पाणीपातळी ८.७५ मीटरवरून ९.८७ मीटरपर्यंत खाली गेली असून, १.१२ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर लांजा तालुक्यात ०.५७ मीटर, चिपळूणमध्ये ०.५३ मीटर आणि संगमेश्वरमध्ये ०.४९ मीटरने पाणीपातळी कमी झाली आहे. मात्र, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांमध्ये दिलासादायक चित्र दिसून आले आहे. दापोली तालुक्यात पाणीपातळीत ०.६९ मीटर, गुहागरमध्ये ०.४५ मीटर आणि खेडमध्ये ०.२६ मीटर सुधारणा नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, वाढते नागरीकरण, विंधन विहिरींची वाढती संख्या आणि न पावसाच्या बदलत्या पॅटर्नमुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी गसंवर्धनाच्या उपाययोजनांना अधिक गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.




