
रत्नागिरी नगर परिषदेच्या तिजोरीत खडखडाट, तरीही विकासरथ थांबणार नाही.
रत्नागिरी शहराच्या सर्वतोपरी आणि जलद विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपरिषदेला तब्बल २७ कोटी रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. या भरीव निधीमुळे परिषद फंडातील तिजोरीत सध्या खडखडाट असला, तरी शहराच्या विकासाचा रथ थांबणार नाही, असा विश्वास नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
या निधीबाबत आमचा कोणताही श्रेयवाद नाही महायुती सरकारने हा निधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले. मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणी सभापती निमेश नायकर, प्रीती सुर्वे, बाळू साळवी आदी उपस्थित होते.
न.प.च्या मुख्य प्रशासकीय इमारतीची प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत सोयीसुविधांसाठी आणखी ४
कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. पानवल धरणाची २ किमीची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी दोन कोटी रत्नागिरी न.प.च्या मिरकरवाडा येथील आणि चर्मालय स्मशानभूमीच्या विकासासाठी प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे एकूण २ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात या दोन्ही स्मशानभूमींचा कायापालट होणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली.




