
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी : नगर परिषद शाळा क्रमांक ३ येथे जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दिनांक १५ जुलै रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश दामले, स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत, माजी अध्यक्ष सीए भूषण मुळये, लक्ष्मीकांत भुते, विनय जोशी तसेच सदस्य संजय पुराणिक, विजय पोकळे, अनिरुद्ध मेस्त्री हे उपस्थित होते.
सीए भूषण मुळये त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमात आर्थिक पुढाकार घेतात. यावर्षी, या उपक्रमात, महेश दामले, मिलिंद सावंत आणि अनिरुद्ध मेस्त्री यांनीसुद्धा सहभाग घेतला. सदर साहित्यामध्ये स्कूल बॅग, वॉटर बॅग, विविध प्रकारच्या वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, चित्रकलेचे साहित्य इत्यादी वर्षभर पुरेल इतके साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. भूषण मुळये यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव ठेवण्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रकाशचंद्र पाडवी यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच शिक्षिका सौ. गौरी कळंबटे यांनी प्रास्ताविक आणि उत्तम दर्जाचे साहित्य दिल्याबद्दल आभार मानले. जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे या शाळेसाठी सलग तीन वर्षे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत आहे.




