चवे देवूड कातळशिल्पाची सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून पाहणी; सोव्हीनियर शॉपचे झाले उद्घाटन

रत्नागिरी, दि. १५ ):- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच, येथे सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (भेटवस्तू केंद्र) उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
​याप्रसंगी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांच्यासह इतर मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
​६० हून अधिक खोदचित्रांचा खजिना
देवूड येथील कातळशिल्पांमध्ये तत्कालीन प्राणी जगताचे अत्यंत वैविध्यपूर्ण, तपशिलवार आणि जिवंत चित्रण पाहावयास मिळते. १५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद अशा विस्तीर्ण खडकावर पसरलेल्या या चित्र समूहामध्ये साठपेक्षा अधिक खोद चित्ररचना आहेत. यात प्रामुख्याने पुढील वैशिष्ट्ये आढळून येतात:
​आक्रमक पावित्र्यातील एकशिंगी गेंडा आणि झेप घेणारे हरीण.
​मार्जार कुळातील कांडेचोर सदृश रचना आणि लांब पिसारा असलेला मोर.
​शरीरावरील केस उभे असलेला तरस आणि लांब व शरीराच्या वरती उचललेल्या शेपटीसह माकड.
​मानवी पावलांसदृश्य चित्ररचना, प्राण्यांच्या शिंगासारख्या आकृत्या आणि काही अमूर्त चित्ररचना.
​मानवी विकासाचा ऐतिहासिक ठेवा
येथील कातळशिल्पे केवळ पुरातत्वीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कलात्मक, पर्यावरणीय व मानव विज्ञानाच्या (Anthropology) दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही खोदचित्रे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जीवनशैली, मानवाची अद्भूत निरीक्षणक्षमता आणि त्यांचे पर्यावरणाशी असलेले घट्ट नाते यांची साक्ष देतात. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार यांनी या सर्व ऐतिहासिक चित्ररचनांची अतिशय बारकाईने पाहणी करत या ठेव्याचे जतन करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button