
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षणास प्रारंभ
"अधिक उपचार, कमी संदर्भ" ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धीकरण
रत्नागिरी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, तसेच “अधिक उपचार, कमी संदर्भ” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून राज्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वंकष “प्राथमिक आरोग्य सेवा” (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रात “सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा” प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.
हे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण पथकाचे डॉ. शरण काठोळे व प्रशिक्षक टीम यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील सर्व ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये टप्याटप्याने प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, एएनएम, एमपीडब्ल्यू तसेच आशा स्वयंसेविका यांचा सहभाग असून, प्राथमिक आरोग्य संस्थांमधील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणात गर्भधारणा, प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतरची माता काळजी, नवजात शिशु व बाल आरोग्य सेवा, बालक व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन, सामान्य संसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार, असंसर्गजन्य आजारांचे (NCD) प्रतिबंध, तपासणी व व्यवस्थापन, डोळे, कान, नाक, घसा यांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवा, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळातील व वेदनाशामक काळजी, तात्काळ वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य सेवा, योग व आयुष उपचार पद्धतींचा अवलंब, नेतृत्व, संवाद कौशल्य तसेच महिलांचे आरोग्य व पुरुषांचा सहभाग या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
हे प्रशिक्षण दोन दिवसीय निवासी स्वरूपात आयोजित केले असून, तांत्रिक सत्रे, संवाद,गटचर्चा, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभागी कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकाधिक रुग्णांवर स्थानिक पातळीवरच उपचार करणे शक्य होईल, अनावश्यक संदर्भ कमी होतील आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी व्यक्त केले आहे.




