रायगड मधील देवकुंड धबधब्यावर प्रशासनाची बंदी झुगारून 17 जणांची हुल्लडबाजी; पुण्याचे दोन पर्यटक बुडाले


पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणगांव तालुक्यातील प्रसिद्ध अशा देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही नियमांचे उल्लंघन करून धबधब्याखाली आनंद घेत असताना हे दोघे जण वाहून गेले असून सध्या ते बेपत्ता आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून १७ जणांचा एक ग्रुप पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देवकुंड धबधब्यावर आला होता. सध्या पावसाचा जोर पाहता रायगड जिल्हा प्रशासन आणि माणगाव स्थानिक प्रशासनाने देवकुंड धबधब्यासह तालुक्यातील सर्वच वर्षा पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, असे असतानाही या ग्रुपमधील पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचले.धबधब्याच्या आवारात बंदी असतानाही हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहाखाली आनंद घेत होते. याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन पर्यटक पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले असून स्थानिक बचाव पथकाच्या सहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button