
पाकिस्तानातील गँगस्टरशी संबंधित युवक चिपळूण येथून ताब्यात
एटीएसच्या पथकाकडून मध्यरात्री धडक कारवाई, चौकशी सुरू
रत्नागिरी:- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या राज्यव्यापी धडक कारवाईचे तीव्र पडसाद आता शांत आणि सुंदर कोकणातही उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एटीएसच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी कारवाई करत एका संशयित युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित डिजिटल आणि सोशल मीडिया संपर्कांच्या तपासाचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्यभरात एकाच वेळी झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १५० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारीचे सत्र राबवले होते. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होता. या भागातून काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आणि तपासाच्या धागेदोऱ्यांच्या आधारे एटीएसचे पथक थेट चिपळूणपर्यंत पोहोचले. पाकिस्तानमध्ये बसून कारवाया करणाऱ्या शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया आणि डिजिटल ‘युजर आयडी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही तरुण त्याच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच संशयावरून चिपळूणमधील या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
कोकणासारख्या शांत आणि निसर्गरम्य पट्ट्यात दहशतवाद विरोधी पथकाने अशी थेट कारवाई केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. या संशयित तरुणाचा संबंध केवळ सोशल मीडियावरील प्राथमिक संभाषणापुरता मर्यादित होता की यामागे एखादे मोठे गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांचे जाळे कार्यरत होते, याचा शोध एटीएसचे अधिकारी घेत आहेत. अद्याप या प्रकरणी एटीएसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रकरणाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




