गोळप कट्ट्यावर कोकण रेल्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक शैलेश बापट यांची प्रकट मुलाखत


रत्नागिरी : गोळप कट्ट्याच्या जून महिन्यातील तिसऱ्या शनिवारी आयोजित ८०व् या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय व्यवस्थापक (रिजनल मॅनेजर) शैलेश बापट यांची अविनाश काळे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

केळ्ये-मजगाव येथील बालपण, रत्नागिरीतील शिक्षण, मालवण व रत्नागिरी पॉलिटेक्निकमधील अभियांत्रिकी शिक्षण आणि १९९१ मध्ये कोकण रेल्वेत झालेली नियुक्ती यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडला. कोकण रेल्वेच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात संगमेश्वर विभागात सर्वेक्षण, जमीन संपादन, पूल व बोगद्यांच्या बांधकामातील अनुभव त्यांनी सांगितला.

शास्त्री नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या भूस्खलनानंतर तत्कालीन सीएमडी ई. श्रीधरन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता सिद्ध केल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर एचआर विभागात कार्यरत असताना सहावा वेतन आयोगाची अंमलबजावणी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सॉफ्टवेअर मॉड्यूल विकसित करणे, सेवा प्रमाणपत्रे, वार्षिक मूल्यांकन व निवृत्ती प्रक्रिया सुलभ करण्याचे उपक्रम राबविल्याची माहिती दिली. या कामासाठी त्यांना तीन चेअरमन पुरस्कारांसह एकूण अकरा-बारा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर रेल्वे प्रकल्पावर काम करताना चिनाब व अंजी पुलांच्या कामाचा अनुभवही त्यांनी मांडला. १७ ऑक्टोबर २०२४ पासून रत्नागिरी विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला असून रोहा ते मडुरे असा ३७८ किमीचा सर्वात आव्हानात्मक रेल्वे विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे.

सध्या कोकण रेल्वेवर क्षमतेच्या सुमारे १३५ टक्के वाहतूक सुरू असून ट्रॅक, स्लीपर व स्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रोहा-वीर दुपदरीकरण पूर्ण झाले असून पुढील टप्प्यासाठी मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भूस्खलन रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पूर्वीच्या तुलनेत अडचणी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी राजाभाऊ जोग यांच्या हस्ते शैलेश बापट यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरीच्या भूमीतून घडलेले आणि कोकण रेल्वेच्या स्थापनेपासून आज क्षेत्रीय व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचलेले शैलेश बापट यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button