
वारीच्या वाटेवर चमत्कारिक दृश्य! माऊलींची पाऊले थांबली; नजरा आकाशाकडे खिळल्या
आषाढी वारी दिंडी सोहळा सध्या सुरु आहे. पुण्यातील मुक्कामानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या.पुणेकरांनी मोठ्या भक्तीभावाने दोन्ही पालख्यांना निरोप दिला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने अवघड दिवे घाट पार केला आहे. अशातच वारीच्या वाटीवर एक चक्रावणारे दृश्य दिसले ज्यामुळे सगळेच थक्क झाले.
सूर्याभोवती गोल रिंगण, वारकऱ्यांची पाऊले थांबली…!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पुणे-सासवड मार्गावरील वडकी परिसरात सूर्याभोवती मोठे कडे असल्याचे दृश्य अनेक वारकरी आणि नागरिकांनी पाहिले. या अनोख्या दृश्यामुळे काही काळ परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. हे दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांची पाऊले थांबली. अनेकांनी या घटनेचे छायाचित्रण आणि व्हिडीओही केले.मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते ही कोणतीही अद्भुत किंवा अपशकुनाची घटना नसून “सोलर हॅलो” (Solar Halo) म्हणून ओळखली जाणारी एक नैसर्गिक वातावरणीय घटना आहे.वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या सिरोस्ट्रॅटस ढगांमध्ये सूक्ष्म बर्फाचे स्फटिक असतात. सूर्यप्रकाश या स्फटिकांमधून जाताना त्याचे अपवर्तन होते आणि त्यामुळे सूर्याभोवती गोलाकार कडे तयार झाल्याचे दिसते. हवामानशास्त्रानुसार अशा प्रकारचे कडे दिसणे हे वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मानले जातात. काही वेळा अशा घटनांनंतर पुढील २४ ते ४८ तासांत हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, सूर्याभोवती कडे दिसणे म्हणजे निश्चितपणे पाऊस पडणारच, असा कोणताही वैज्ञानिक निष्कर्ष नाही.




