
खेडमध्ये ५०० हून अधिक पूरग्रस्तांचे पंचनामे; बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर
खेड : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने खेड तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरग्रस्त भागांतील पंचनाम्यांच्या कामालाही वेग आला असून आतापर्यंत ५०० हून अधिक बाधित दुकानांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यामध्ये ५० हून अधिक बाधित घरांचाही समावेश असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.
जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले होते. सलग सुमारे २३ तास बाजारपेठ पाण्याखाली राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक दुकाने आणि घरे बाधित झाली असून नुकसानीचा नेमका आकडा सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
पूरस्थिती ओसरल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. तसेच नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बाजारपेठेतील व्यवहारांना पुन्हा गती
मुसळधार पावसामुळे आणि जगबुडी नदीच्या पुरामुळे मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेतील स्वच्छता, दुरुस्ती आणि व्यवहार पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दुकानदारांनी नुकसानग्रस्त साहित्याची विल्हेवाट लावून दुकाने पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार हळूहळू सुरळीत होत असून व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




