
एखाद्या दालनात जाऊन बसलं तर त्या दालनाचा तो माणूस होतो अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हे योग्य केलं नाही’-जयंत पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार नारायण राणे, शरद पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.ही बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) आमदारांची बैठक घेतली होती. मात्र, यावरून शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती.
‘शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते’, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक का घेतली? यांचं कारण सांगितलं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत महत्वाची बैठक होती. या बैठकीनंतर आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली की भेटायचं आहे. यावेळी दुसऱ्या मजल्यावरून खाली तळ मजल्यावर आल्यानंतर सर्वात जवळ कुठलं दालन होतं तर एकनाथ शिंदे यांचं होतं. कारण शरद पवार यांना तब्येतीमुळे जास्त अंतरावर चालत घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की या दालनात बसू आणि चर्चा करू. तेव्हा मग आम्ही सर्व सदस्य त्या ठिकाणी बसलो’, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.विधानसभेतील कुठल्या किंवा कोणाच्या दालनात बैठक घेतली, म्हणजे ही दालनं कोणाच्या मालकीची असतात असं नाही. हे विधिमंडळ सर्वांचं आहे. त्यातही समजा सोयीसाठी एखाद्या दालनात जाऊन बसलं तर त्या दालनाचा तो माणूस होतो अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हे योग्य केलं नाही’, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
‘शरद पवारांना देशातील सर्वच नेते भेटत असतात, बोलत असतात. त्यामुळे यामध्ये कुठेही प्रतिष्ठा किंवा विश्वासाहर्तेचा प्रश्न येतो असं मला वाटत नाही. विधिमंडळातील प्रत्येक दालन हे सर्वांच आहे. एखाद्या दालनावर एखाद्या मंत्र्यांची पाटी लावलेली असली तरी ते दालन आम्ही आमच्या सोयीसाठी वापरलं. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण शरद पवार यांची प्रकृती पाहता त्यांना चालण्याचं अंतर कमी करण्यासाठी आणि ते दालन सोयीचं होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली’, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत’ : संजय राऊत
‘शरद पवार हे गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. शरद पवारांच्या कृतीमुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. तुम्ही जर गद्दारांना प्रतिष्ठा देत असाल तर तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. अजित पवारांनीही गद्दारीच केली, मग त्यांच्याविरोधात कोर्टात जाणं, भूमिका घेणं हे तुम्ही का केलंत? एकनाथ शिंदेंविरोधात आम्ही लढतो आहोतच. तुम्ही त्यांना प्रतिष्ठा का देता? आम्हाला ही बाब मनाला लागली. शरद पवार आणि माझे संबंध अत्यंत प्रेमाचे आणि स्नेहाचे आहेत. पण पक्षाच्या भूमिकेशी मी ठाम आहे. मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर राज्याची बदनामी होणारच. शरद पवारांशी मी कधीही बोलू शकतो. हा विषय आमच्यासाठी पक्ष म्हणून गंभीर आहे. ज्यांनी तुमच्याशी गद्दारी केली आहे त्यांच्या छताखाली जाऊन आम्ही बैठक घेणार नाही’, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.




