तळगावातील सामाईक जमिनीतील खैराची चार झाडे तोडून चोरी; ग्रामपंचायत शिपायाविरोधात तक्रार

राजापूर : तालुक्यातील तळगाव येथील सामाईक जमिनीतील खैराची चार झाडे परवानगीशिवाय तोडून चोरी केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीतील शिपाई प्रताप संजय सावंत याच्याविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तळगाव पाटीलवाडी येथील भूषण विलास सावंत यांनी आपल्या वयोवृद्ध वडील विलास धाकू सावंत यांच्या वतीने ही तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वे क्रमांक २७६५ मधील गौळणमळी परिसरातील सामाईक जमिनीत असलेली १० ते १२ वर्षे वयाची चार खैराची झाडे ऑगस्ट २०२५ मध्ये तोडून नेण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कामगारांकडे चौकशी केली असता त्यांनी प्रताप सावंत यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यानंतर वन विभागाकडे तक्रार करण्यात आली. वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पोलिसांना सादर केला आहे.
या प्रकरणी प्रताप संजय सावंत याने खैराची झाडे तोडून चोरून नेल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने राजापूर पोलिसांकडे केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button