खेडमध्ये भूस्खलनाची मालिका; पाच दिवसांत पाच ठिकाणी डोंगर खचले, लोकवस्तींमध्ये भीतीचे वातावरण

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यावर भूस्खलनाचे मोठे संकट ओढवले असून अवघ्या पाच दिवसांत तालुक्यात पाच ठिकाणी डोंगर खचून मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे लोकवस्तींनजीकचे डोंगर खचू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहाटे खेड तालुक्यातील आपे येथील शेलारवाडी तसेच मोरेवाडी येथे लोकवस्तीच्या अगदी जवळच डोंगराचा मोठा भाग खचून भूस्खलन झाले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यापूर्वी खवटी येथे झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तब्बल २० तास वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर दहिवली येथील गुडूपवाडीमध्ये पाच घरांवर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच चिंचवली गावातील गोटलवाडी परिसरात डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याचे समोर आले होते.
आता आपेडे येथील शेलारवाडी आणि मोरेवाडी येथील ताज्या भूस्खलनाच्या घटनांमुळे अवघ्या पाच दिवसांत तालुक्यात भूस्खलनाच्या पाच घटना घडल्या आहेत. सततच्या या घटनांमुळे संपूर्ण खेड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक डोंगरांचे तातडीने सर्वेक्षण, जोखमीच्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button