काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव!

नागपूर : काशीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक अनुभव आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा आणि समाजकंटकांनी डब्यात अक्षरशः हौदोस घातल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण थरार आणि त्रास सांगताना पीडित महिलांना नागपुरात पोहोचल्यावर रडू कोसळले.

72 प्रवाशांच्या डब्यात 400 जणांचा जमाव

संबंधित पीडित प्रवाशांनी 3 ते 4 महिने आधीच या गाडीचे आरक्षण केले होते. मात्र वाराणसी स्टेशनवर गाडी आली असता, तेथे आधीच प्रचंड गर्दी होती. 72 प्रवाशांची क्षमता असलेल्या आरक्षित डब्यामध्ये 400 हून अधिक लोकांचा अनधिकृत जमाव बळजबरीने घुसला. या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना गाडीत शिरणेही कठीण झाले होते.

महिलांचा विनयभंग आणि अश्लील शेरेबाजी
गाडीत प्रवेश करत असताना गर्दीचा गैरफायदा घेत काही हुल्लडबाजांनी महिलांच्या अंगाला स्पर्श करत त्यांचा विनयभंग केला. डब्यात शिरल्यानंतरही महिलांना सातत्याने छेडछाड आणि अश्लील शेरेबाजीला तोंड द्यावे लागले. काही पुरुषांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, हुल्लडबाजांनी त्यांच्यावर हातही उगारल्याचे प्रवाशांनी सांगितले.

तक्रार करूनही रेल्वे यंत्रणा सुस्त

प्रवासादरम्यान घडणाऱ्या या गंभीर प्रकाराची माहिती प्रवाशांनी रेल्वेच्या ‘१३९’ या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून दिली. इतकेच नव्हे तर रेल्वेच्या ‘एक्स’ खात्यावरही ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली. मात्र दोन्ही ठिकाणी दाद मागूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही तत्पर कारवाई करण्यात आली नाही.

पोलिसांची हतबलता आणि नैनी स्थानकावर रेल्वे रुळांवर आंदोलन
या त्रासाला आणि अश्लील शेरेबाजीला कंटाळून अखेर महिलांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी नैनी स्थानक गाठताच थेट गाडीसमोर आणि रेल्वे रुळांवर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले. यानंतर उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली असता, त्यांनी “इथे गर्दी फार आहे, आम्ही काही करू शकत नाही आणि डब्याच्या आत येऊ शकत नाही,” अशी हतबलता व्यक्त करत हात वर केले.

नागपूर पोलिसांचीही बेफिकिरी

या भीषण मनस्तापातून कसेबसे नागपुरात पोहोचलेल्या पीडित प्रवाशांना येथेही प्रशासकीय बेजबाबदारपणाचा सामना करावा लागला. नागपुरात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता ‘नोंदवलेली तक्रार उत्तर प्रदेशात जाऊन द्या’, असे सांगत नागपूर पोलिसांनी बेफिकिरी दाखवली. रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचे धिंडवडे काढणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button