
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा; छताचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका रविवारी रात्री रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला. रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास स्थानकाच्या रिक्षा स्टँडकडील बाजूच्या छताचा काही भाग अचानक कोसळल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रवासी संबंधित छताखाली उभे होते. मात्र छत हलताना दिसताच त्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. छत कोसळल्यानंतर स्थानकाच्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसर काही काळ अंधारात बुडाला.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र या कामादरम्यानही जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे छताचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाचा पुरेसा विचार करून काम करण्यात आले होते का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने परिसर सुरक्षित करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. या प्रकारामुळे नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी व आवश्यक दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




