पुराच्या वेगवान प्रवाहात अडकलेल्या दुचाकीस्वाराला गुरव बंधूं कडून जीवदान; प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ


राजापूर शहरातील उन्हाळे येथील श्री स्वामी समर्थ मठासमोरील मोरीवरून वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका दुचाकीस्वाराचे प्राण गुरववाडी येथील वैभव गुरव आणि जगदीश गुरव या बंधूंनी धाडसी बचावकार्य करून वाचविले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून, या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही घटना गुरुवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फुपेरे येथून दुचाकीवरून राजापूरच्या दिशेने येत असलेले जाधव (वय ४२) यांनी मोरीवरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते पुराच्या प्रवाहात अडकले. दुचाकी काही अंतर वाहून गेली, तर जाधव यांनी जवळील एका झाडाचा आधार घेत मदतीसाठी आर्त हाका मारण्यास सुरुवात केली.

याचवेळी त्या मार्गावरून जात असलेल्या वैभव गुरव आणि जगदीश गुरव यांच्या नजरेस मोरीजवळ पडलेली दुचाकी आली. संशय आल्याने त्यांनी तातडीने परिसरात पाहणी केली असता, पुराच्या पाण्यात झाडाला धरून जीव वाचविण्यासाठी संघर्ष करणारे जाधव त्यांना दिसले.

बचावासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसतानाही दोन्ही भावांनी प्रसंगावधान राखत झाडांच्या वेलींचा तात्पुरता दोर तयार केला. त्याच्या साहाय्याने त्यांनी जाधव यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या बचाव मोहिमेदरम्यान दोघेही पूर्णपणे भिजले, मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविले.

सुरक्षित बाहेर आल्यानंतर भावूक झालेल्या जाधव यांनी गुरव बंधूंचे आभार मानत, “तुम्ही वेळेवर मदतीला धावून आला नसता, तर माझा जीव वाचला नसता,” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.

दरम्यान, पावसाळ्यात पूल, मोरी किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना तेथून वाहन नेण्याचा धोका टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरव बंधूंनी दाखविलेले धाडस, प्रसंगावधान आणि सामाजिक बांधिलकी यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून, राजापूर परिसरातून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button