विकसित भारत जी राम जी योजनेचा शुभारंभअधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवावी-जिल्हाधिकारी वैदेही रानडेगाव पातळीवर मेळावे घेऊन प्रचार प्रसिध्दी करावी-जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे


रत्नागिरी, दि. 2 ) : विकसित भारत जी राम जी ही योजना ग्रामीण भागात अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, एनजीओ यांनी हातात हात घालून प्रभावीपणे राबवावी. त्याचा दृश्य परिणाम उपजिविकेची साधन निर्माण होण्यात निश्चितच दिसेल. विकासाचा दर वाढून जीवनमान उंचावेल, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले. तर गाव पातळीवर मेळावे, कार्यक्रम घेऊन या योजनेची प्रचार प्रसिध्दी आणि जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी केले.
येथील नियोजन समिती सभागृहात विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) व्ही बी जी राम जी योजनाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, समाज कल्याण सभापती ॲङ सुयोग कांबळे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य माधवी गिते, महेश म्हाप, उषा सावंत, शिवाणी सावंत, पंचायत समिती उपसभापती गजानन धनवडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या, महाराष्ट्रात पहिल्यांदा रोजगार हमी योजना आली त्या धरतीवर केंद्र शासनाने महात्मा गांधी मनरेगा ज्याला आपण रोजगार हमी योजना म्हणतो ती आणली. आता आपण मनरेगातून व्हिबीजी रामजीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतोय. विकसित भारत 2047 उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवलेले आहे. ग्रामीण भागातल्या लोकांचं बळकटीकरण हा उद्देश आहे. त्यासाठी ग्रामीण भागात उपजीविकेची साधनं निर्माण व्हावीत. समतोल विकास साधला जाईल विकासाचा दर वाढेल आणि जेणेकरून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावेल. हा या योजनेचा उद्देश आहे. पारदर्शक तत्व हे या योजनेचा गाभा आहे. आपण सगळ्यांनी ही योजना अधिक परिणामकारक आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे राबवू या.
तळागळातील घटक सक्षम झाला पाहिजे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यासाठी व्हीबीजी रामजी या योजनेची माहिती गाव पातळीवर मेळावे घेऊन द्यायला हवी, असे सांगून जिपअध्यक्ष श्रीमती केंद्रे म्हणाल्या, ही योजना सफल करण्यासाठी ती तळागळातील लोकांपर्यंत पोहचवायला हवी. आपली सर्वांची ही जबाबदारी आहे, त्यासाठी जिल्हा परिषद 100 टक्के तुमच्या पाठीशी आहे. ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊ या.
उपजिल्हाधिकारी रोहयो हर्षलता गेडाम यांनी संगणकीय सादरीकरण करुन या योजनेची सविस्तर माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनीही सविस्तर प्रस्तावना करुन माहिती दिली. चक्रभेदी फाऊंडेशनच्या वैदेही सावंत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय मान्यता पत्र लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी रणजित गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button