
परशुराम घाटातील संरक्षक गॅबियन भिंतीला धोका; मुसळधार पावसाने पाया खचला, महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत चिंता
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात महामार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन संरक्षक भिंतीला (Gabion Wall) मुसळधार पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे भिंतीच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याने तिचा पाया कमकुवत झाला असून, संरक्षक भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या निर्मितीनंतर दरडी कोसळणे आणि माती घसरण्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी परशुराम घाटात गॅबियन संरक्षक भिंती उभारण्यात आल्या होत्या. मात्र, आता याच संरचनेच्या पायाभागातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भिंतीचा आधार कमी झाला असून संपूर्ण संरचना धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे.
प्रत्यक्ष पाहणीत गॅबियन भिंतीच्या फाउंडेशनखालचा मोठा भाग खचल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, परशुराम घाटाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी या गॅबियन संरचनेवर असून तिच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.
अवघ्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, तर संपूर्ण पावसाळ्यात धोका आणखी वाढू शकतो. संरक्षक भिंत कोसळल्यास परशुराम घाटातील वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, महामार्गाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून संरक्षक भिंतीची दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.




