
महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; कोकणात ऑरेंज आणि यलो अलर्ट
महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबईत सकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात, उत्तर कोकण, गोवा आणि कारवार परिसरात दिवसभर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासून गेल्या काही वेळात पावसाचा जोर वाढला असून, मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.
ताज्या उपग्रह आणि रडार निरीक्षणानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक भागांवर दाट पावसाळी ढग सक्रिय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील तीन ते चार तास अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात ऑरेंज आणि यलो अलर्ट
हवामान विभागाने पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.




