
सहकाराच्या बळकटीसाठी सर्व सरकारांचे योगदान महत्त्वाचे : बाबाजीराव जाधव

रत्नागिरी : सहकार क्षेत्राच्या विकासात विविध काळातील केंद्र व राज्य सरकारांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा मोठा वाटा असून माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा सहकारमंत्री शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत सर्वांनी सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह कोकणातील सहकार चळवळ अधिक सक्षम आणि व्यापक झाली, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले.
केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील मराठा भवनात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गिम्हवणेकर, संचालक तथा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, संचालक रामभाऊ गराटे, अमजद बोरकर, आबा टिळेकर, सौ. नेहा माने, गजानन पाटील, मंदार सप्रे तसेच अन्य संचालक आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबाजीराव जाधव यांनी सहकार चळवळीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याबरोबरच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि लघुउद्योजकांना सक्षम करण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले. बदलत्या काळात सहकारी संस्थांनी पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकाभिमुख धोरणे स्वीकारून अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ॲड. दीपक पटवर्धन यांनी सहकारी संस्थांनी सक्षम व्यवसाय मॉडेल उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याची आवश्यकता व्यक्त केली. संस्थांना चांगला नफा मिळाल्यास त्याचा थेट लाभ ग्रामीण भागाच्या विकासाला होत असून गावांच्या आर्थिक प्रगतीलाही गती मिळते. जागतिक पातळीवर होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांनीही आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना आत्मसात करून काळानुरूप वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.




