
अखेर बालभारतीकडून ’त्या’ चुकीची दुरूस्ती
इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास ’मर्यादित’ केल्याप्रकरणी प्रहार शिक्षक संघटनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला अखेर अवघ्या काही तासांत मोठे यश आले आहे. संघटनेचे २१ जून रोजी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पुराव्यासह निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बालभारतीने आपल्या अक्षम्य ऐतिहासिक चुकीची जाहीर कबुली देत अखेर राज्यभरातील शाळांसाठी अधिकृत शुद्धीपत्रक जारी केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालिका अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रानुसार इयत्ता तिसरीच्या ’आपल्या सभोवतालचे जग भाग २’ या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील ’माहित आहे का तुम्हांला?’ या चौकटीत आता अधिकृत बदल करण्यात आला आहे.त्या बदलाचा मुख्य मजकूर असा आहे की, पाठ्यपुस्तकातील जुने वाक्य ’ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय’ हे पूर्णपणे बदलून आता तिथे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय, असा नवीन मजकूर समाविष्ट केला आहे.www.konkantoday.com




