शीळ धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ, रत्नागिरी शहरावरील पाणी संकट दूर

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य स्त्रोतातून अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शीळ धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. धरणाची पाणीपातळी आता ११२.६० मीटरपर्यंत वाढली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ०.९४० दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे. आठवड्यापूर्वी धरणातील साठा चिंताजनक पातळीवर गेल्यामुळे रत्नागिरी शहरावर घोंगावणारे तीव्र पाणीकपातीचे संकट आता टळण्याची चिन्हे आहेत.
यंदा ऊन्हाळा लांबल्याने आणि जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. अवघ्या आठवड्यापूर्वी धरणातील साठा अवघा ०.४५३ दशलक्ष घनमीटर इतका खाली आला होता. धरणाची एकूण साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर असून, साठा अत्यंत मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र पाणीकपातीची भीती निर्माण झाली होती. प्रशासनालाही पाणी पुरवून वापरण्याचे नियोजन करावे लागत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button