
कुणकेश्वर -गणपतीपुळे गाड़ी अचानक बंद -प्रवाश्याचे अतोनात हाल, पालकमंत्री उदयजी सामंत आमदार किरणजी सामंत आणि विभाग नियंत्रक रा. प. रत्नागिरी यांना निवेदने सादर
दिनांक 15जून पासून सिंधुदुर्ग मधील कुणकेश्वर ते थेट गणपतीपुळे पर्यंत चांगल्या भारमानात सुरु असलेली थेट गणपतीपुळे पर्यंतची एकमेव कुणकेश्वर -गणपतीपुळे ही गाड़ी अचानक बंद केल्याने रत्नागिरी ड़ेपोच्या अधिकाऱ्याविरोधात प्रवाश्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ही गाड़ी तत्काळ सुरु करावी अशी मागणी जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदयजी सामंत,लोकप्रिय आमदार किरणजी सामंत आणि राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरीचे विभागनियंत्रक याना दिले आहे..
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारामार्फत गेली पांच वर्ष ही गाड़ी अत्यंत चांगल्या भारमानात सुरु होती. सिंधुदुर्गातील कोणत्याही ड़ेपोतून कोकणातील गणपतीपुळे या सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्री एकही गाड़ी सुरु नाही. रत्नागिरीतील लांजा, राजापुर डेपोतुनही गणपतीपुळे ला एकही थेट गाड़ी सुरु नाही. रत्नागिरी कुणकेश्वर ही गाड़ी कुणकेश्वर या सिंधुदुर्ग मधील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून ते थेट सुप्रसिद्ध तीर्थंक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे या दरम्यान रत्नागिरी आगारामार्फत चांगल्या भारमानात सुरु होती. अनेक भाविकाना कुणकेश्वर आणि गणपतीपुळे या दोन तीर्थंक्षेत्री दर्शन एकाच दिवशी घेता येत होते. ही गाड़ी ज्या वेळेत सुरु होती, त्या वेळेत रत्नागिरीला जाणारी दूसरी गाड़ी नसल्यामुळे देवगड, जामसांडे, पडेल, सागवे, जैतापुर, नाटे, आड़ीवरे, गावखड़ी, पावस या मार्गावरील प्रवाश्याना या मार्गावर प्रवास करने सोइचे झाले होते. तसेच या मार्गाकर सागवेची कात्रादेवी, आड़ीवरेची महाकाली, पावसचे स्वामी स्वरूपानंद मंदिर असल्याने भाविकाना याही तीर्थक्षेत्री दर्शन घेता येत होते.
ही गाड़ी कोणतेही कारण न देता रत्नागिरी आगाराच्या अधिकाऱ्यानी बंद केल्याने भाविक प्रवश्यानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ही गाड़ी तत्काळ सुरु करावी अशी निवेदने करगुटकर यांनी सादर केली आहेत.




