कोयना खोऱ्यात बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहीम यशस्वी

चिपळूण, दि. २२ : अर्थ फाऊंडेशन आणि ग्लोबल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण तालुक्यातील कोयना खोरे परिसरात बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत चिपळूणचे निसर्ग-पर्यावरण अभ्यासक समीर कोवळे, जल अभ्यासक शाहनवाज शाह आणि कृषी अभ्यासक पृथ्वीराज पवार यांनी सहभाग घेतला.

या स्वयंस्फूर्त अभ्यास मोहिमेदरम्यान सहभागी शिलेदारांनी सह्याद्री पर्वतरांगा, कोयना खोरे परिसर तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच्या बफर झोनमधील विविध भागांची पाहणी केली. काही दुर्गम भागांमध्ये ट्रेकिंग आणि गिर्यारोहण करत स्थानिक पर्यावरण, लोकजीवन आणि नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला.

मोहिमेदरम्यान बाजे-वाजेगाव, वनकुसवडे, पळासरी आदी विस्थापित गावांचा जंगल परिसर, कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा काही भाग, आसपासची गावे, लोकवस्ती आणि शेतशिवार यांची पाहणी करण्यात आली. यंदा उन्हाळा लांबल्याने वाढलेल्या उष्णतेचा परिणाम परिसरातील जलस्रोत आणि पर्यावरणावर झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

स्थानिक ग्रामस्थ हणमंत सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००० पूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली असून मोठ्या प्रमाणात गाळ जलाशयात साचला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी साठवणुकीच्या क्षमतेत सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जंगल परिसरात ॲकेशिया आणि निलगिरी यांसारख्या विदेशी वृक्षांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले.

धरणाच्या जवळ असूनही सिंचन व्यवस्थेचा अभाव असल्याने शेती व पूरक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मोहिमेदरम्यान आढळले. स्थानिकांचे जीवन शेती, पशुपालन आणि शेळीपालनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

जलाशयाची पातळी घटल्याने धरण निर्मितीपूर्वी बुडालेल्या भागातील घरांचे, मंदिरांचे आणि इतर वास्तूंचे अवशेष पुन्हा उघडे पडले आहेत. यामध्ये बाजे-वाजेगाव येथील ग्रामदैवत श्रीदेवी बाजूबाई मंदिर, श्री लक्ष्मी देवी मंदिर, राणीबाईचा वाडा तसेच पुरातन घरगुती वस्तूंच्या अवशेषांची पाहणी करण्यात आली. पळासरी गावातील जुन्या लोकवस्तीचे अवशेष आणि मारुती मंदिराचाही अभ्यास करण्यात आला.

परतीच्या प्रवासात मोहिमेतील सदस्यांनी वनकुसवडे येथील उंबरघळ परिसरातील नैसर्गिक पुरातन गुहा पाहून त्याचा अभ्यास केला.

या मोहिमेसाठी स्थानिक मार्गदर्शक निलेश फुटाणे आणि हणमंत सुतार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोयना खोऱ्यातील दुर्गम भागातील पर्यावरण, जलसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक जीवनपद्धतीचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने आयोजित ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button