खेडशी येथे भीषण अपघात; भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, डंपर चरात कोसळला


रत्नागिरी, हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून तो सुमारे दहा फूट खोल चरात कोसळल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जाकादेवी खालगाव येथील पांचाळ कुटुंबातील संबंधित महिला दुचाकीवरून प्रवास करत असताना खेडशी परिसरात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की महिला डंपरच्या खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर महामार्गावरून खालील बाजूस असलेल्या सुमारे दहा फूट खोल दरीत जाऊन कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृत महिलेची ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे खेडशी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button