
कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; मे महिन्यात ६१ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी आढळले
थकीत भाडे आणि दंडापोटी ३.७० कोटी रुपयांची वसुली; वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन
रत्नागिरी : तिकीटविरहित आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. मे २०२६ या महिन्यात कोकण रेल्वेने ९५१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवून ६१,०५१ विनातिकीट अथवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रकरणे उघडकीस आणली.
या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून थकीत रेल्वे भाडे आणि दंडापोटी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. प्रवाशांनी नियमांचे पालन करून वैध तिकिटासहच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि त्रासमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
प्रामाणिक प्रवाशांना अधिक चांगली सेवा आणि सुविधा मिळाव्यात, तसेच रेल्वेतील शिस्त कायम राहावी यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करून वैध तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




