
रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४.८६ टक्केच पाणी
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या ५४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३४.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण ४७७.३७ दलघमी उपयुक्त साठवण क्षमतेपैकी सध्या १५८.७२ दलघमी पाणी उपलब्ध आहे.
दरम्यान, आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास जिल्हयातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ६८ मध्यम ते लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक जलक्षमता असलेल्या प्रकल्पांचा विचार केला असता, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी हा सर्वात मोठा प्रकल्प तब्बल ५८.१३ टक्के भरला आहे. त्यात ४८.१९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
तसेच राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प ४४.६२ टक्के साठ्यासह (३२.३७ दलघमी) दुसर्या क्रमांकावर आहे. याउलट खेड तालुक्यातील नातुवाडी मध्यम प्रकल्पात २६.५५ टक्के (७.२३ दलघमी) आणि पिंपळवाडी प्रकल्पात २१.३७ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. लांजा येथील मुचकुंदी प्रकल्पामध्ये ३०.०५ टक्के पाणी शिल्लक असून धरणांची ही आकडेवारी पाहता सध्यातरी पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.
www.konkantoday.com




