उमेदवाराची माघार महाविकास आघाडीसाठी धक्कादायक; भाजपच्या राजकीय दबावाचे द्योतक : सोनललक्ष्मी घाग


रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने घेतलेली माघार ही महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असून मित्रपक्ष आणि मतदारांच्या विश्वासाला तडा देणारी घटना असल्याची टीका काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात घाग म्हणाल्या की, महायुतीकडे आधीच पुरेसे संख्याबळ आणि मतदारांचे समर्थन असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडणे हा भाजपचा हतबलतेतून केलेला राजकीय डाव असल्याचे दिसून येते. ही जागा काँग्रेस पक्षाकडे असती, तर विजय-पराजयाची चिंता न करता काँग्रेसने ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली असती.

त्यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारामागे ठामपणे उभा राहिला असता. विधानसभा निवडणुकीत संधी देणाऱ्या आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी देणाऱ्या पक्षालाच अडचणीत आणणारे नेते कोणत्याही पक्षात दीर्घकाळ समाधानाने राहू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या नावाखाली भविष्यात अशा अविश्वसनीय उमेदवारांचा प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मतही घाग यांनी व्यक्त केले.

देशात भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळत असताना महायुतीतही अंतर्गत मतभेद आणि धुसफूस स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. या निवडणुकीत शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असल्याची चर्चा असल्याचे सांगत, घराणेशाहीविरोधातील वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन भाजपने बदलाचे वारे ओळखल्याचेही त्या म्हणाल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला राजकीय दबाव अथवा घोडेबाजाराच्या माध्यमातून माघार घ्यायला लावणे म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची अप्रत्यक्ष कबुली असल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण घडामोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button