
कोकण रेल्वे भरती मुलाखतींचे केंद्र विशाखापट्टणम; स्थानिक युवकांत नाराजी, निर्णय फेरविचाराची मागणी
कोकण रेल्वेच्या १३२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्याच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने या निर्णयाला विरोध दर्शवत मुलाखतीची केंद्रे कोकण व महाराष्ट्रातच ठेवावीत, अशी मागणी केली आहे.
कोकण रेल्वेने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित पदांसाठीच्या मुलाखती ८ जूनपासून विशाखापट्टणम येथे ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. भरती प्रक्रिया कोकण रेल्वेशी संबंधित असताना मुलाखतीचे ठिकाण महाराष्ट्राबाहेर निश्चित केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कोकण व महाराष्ट्रातील उमेदवारांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे म्हटले आहे. विशेषतः बेरोजगार युवकांसाठी हा खर्च आणि प्रवास मोठे आव्हान ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
समितीने मुलाखती पूर्वीप्रमाणे मुंबई, बेलापूर, मडगाव आणि रत्नागिरी या केंद्रांवर घेण्याची मागणी केली आहे. तसेच उमेदवारांच्या सोयीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
युवकांच्या हितासाठी हा मुद्दा पुढेही लावून धरणार असल्याचे सांगत, स्थानिक उमेदवारांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.




