
मुंबई-गोवा महामार्गावरील भंगार गोडाऊनला भीषण आग; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी बसथांबा परिसरातील एका भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की धुराचे आणि ज्वालांचे प्रचंड लोट आकाशात झेपावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हॉटेल अन्नपूर्णा शेजारील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा साठा करण्यात आला होता. या साठ्यात प्लास्टिकचे ड्रम, प्लास्टिक पिशव्या, रासायनिक कारखान्यांमध्ये वापरलेले रिकामे ड्रम, लोखंडी साहित्य तसेच अन्य ज्वलनशील वस्तूंचा समावेश होता. अचानक आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला.
आगीची तीव्रता पाहता सुरुवातीला जवळील एखाद्या रासायनिक कारखान्यात आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू झाली होती. घटनेची माहिती मिळताच घरडा केमिकल्सचा अग्निशमन बंब तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. यावेळी आवाशी गावातील अनेक तरुणांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.




