खेळता खेळता विहिरीत पडून ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; निवेंडीतील हृदयद्रावक घटना


रत्नागिरी : जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवतीनगर, निवेंडी येथे खेळत असताना विहिरीत पडून तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दहिसर येथील स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३) ही आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी निवेंडी येथे आली होती. ३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास ती इतर मुलांसोबत घराजवळ खेळत होती. काही वेळाने ती नजरेस न पडल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.

शोधादरम्यान घराजवळील विहिरीत पाहिले असता स्वरा पाण्यात पडल्याचे आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने विहिरीबाहेर काढण्यात आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून सीपीआर देण्यात आला. त्यानंतर तिला उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

निरागस वयात झालेल्या स्वराच्या दुर्दैवी निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button