
लांजा एसटी स्थानकात वाहकाला मारहाण; प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल
कर्तव्य बजावत असलेल्या एसटी वाहकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना लांजा एसटी स्थानकात घडली असून, या प्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा आरोपांखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२ जून) दुपारी सुमारे २.३० वाजता देवरूख-लांजा मार्गावरील एसटी बस लांजा स्थानकातून प्रवाशांसह रवाना होत होती. त्यावेळी बसमधील एका प्रवाशाने त्याची आई खाली राहिल्याचे सांगत बस थांबविण्याची मागणी केली. वाहक राहुल लक्ष्मण खानविलकर यांनी चालकाला सूचना दिल्यानंतर बस काही अंतरावर थांबविण्यात आली.
मात्र, यानंतर संबंधित प्रवाशाने वाहकाकडे जाऊन आक्रमक भूमिका घेत वाद घालण्यास सुरुवात केली. वाहकांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला देत तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने वाहकाच्या अंगावर धाव घेत त्यांची कॉलर पकडली व झटापटीदरम्यान शर्टचे नुकसान केले.
यावेळी संबंधित व्यक्तीने वाहक आणि चालकाला धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे एसटी स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी वाहक राहुल खानविलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय तुकाराम खाके (रा. पालू खाकेवाडी, ता. लांजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.



