
रत्नागिरी जिल्ह्यात ५० हजार वाहने अजूनही ’एचएसआरपी’ विना
रत्नागिरी जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले असतानाही अजूनही सुमारे ५० हजार वाहनधारकांनी याबाबत उदासीनत्ता दाखविली आहे. शासनाने यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता दि. ३० जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर थेट एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहन चोरी, बनावट नंबरप्लेट आणि गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी ’एचएसआरपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंबरप्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये, लेझर कोडिंग आणि नोंदणीची डिजिटल माहिती असल्याने वाहनांची ओळख पटविणे अधिक सोपे होते. त्यामुळे शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करूनही अनेक वाहनधारकांनी अद्याप ’एचएसआरपी’ बसवून घेतलेली नाही.
जिल्ह्यात पात्र जुन्या वाहनांची संख्या २ लाख ११ हजार ४२३ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५४७ वाहनधारकांनी ’एचएसआरपी’साठी बुकिंग केले आहे. बुकिंग झालेल्या वाहनांपैकी १ लाख ५१ हजार १९१ वाहनांवर नंबरप्लेट बसवून पूर्ण झाली असून, १० हजार ३५६ वाहनांची प्रक्रिया सुरू आहे. याउलट अजूनही ४९ हजार ८७६ वाहनधारकांनी ’एचएसआरपी’साठी बुकिंगच केलेले नाही. त्यामुळे ही सर्व वाहने सध्या जुन्या किंवा फॅन्सी नंबरप्लेटवरच धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या मते, उर्वरित वाहनधारकांनी पुढील दीड महिन्यात नंबरप्लेट बसवून घेतली नाही तर त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.www.konkantoday.com




