
रत्नागिरीत वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्युत दाहिनीत मृतदेह अडकला
ठाकरे शिवसेना आक्रमक
रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, येथील जनरेटर गेली ६ महिने बंद अवस्थेत आहे आणि त्यात नक्की काय बिघाड झाला आहे, याची साधी माहितीही संबंधित पालिका अधिकाऱ्यांना नाही. या हलगर्जीपणामुळे मृतदेह तब्बल ७ तास विद्युत दाहिनीतच अडकून पडला. या गंभीर प्रकारानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे.
रविवार, २५ मे २०२६ रोजी कोकणनगर स्मशानभूमीत कै. वाकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक जमले होते. सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर मृतदेह विद्युत दाहिनीमध्ये सरकवण्यात आला. मात्र, त्याच वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला.आपत्कालीन परिस्थितीसाठी स्मशानभूमीत ठेवण्यात आलेला जनरेटर गेल्या ६ महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. त्यात नक्की काय तांत्रिक समस्या आहे, याचे ज्ञान पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना नसल्याने ऐनवेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था करता आली नाही. मृतदेह दाहिनीच्या आत गेल्यामुळे तो बाहेर काढणेही शक्य नव्हते. यामुळे मृतकाच्या नातेवाईकांना अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी तब्बल ७ तास ताटकळत वाट पाहावी लागली. या धक्कादायक प्रसंगानंतर संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र सवाल उठवले आहेत.शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नगरपरिषदेला पत्रया प्रकारानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना पत्र लिहून तीव्र निषेध नोंदवला. या पत्राद्वारे त्यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
जनरेटरची तातडीने दुरुस्ती: ६ महिन्यांपासून बंद असलेल्या जनरेटरमधील बिघाड शोधून तो तत्काळ दुरुस्त करण्यात यावा.
पर्यायी व्यवस्था: स्मशानभूमीत अखंडित वीज पुरवठ्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करावी.
अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई: संबंधित अधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची जाहीर माफी मागावी. तसेच या गंभीर हलगर्जीपणासाठी जबाबदार दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
यावेळी उपस्थित पदाधिकारीनगरपरिषदेत मागणीचे पत्र देतेवेळी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्यासहित उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेटे, विभागप्रमुख अमित विलणकर, राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे आणि गौरव कळंबटे उपस्थित होते.या घटनेमुळे रत्नागिरीतील नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, मूलभूत सुविधांच्या अशा दुरवस्थेमुळे पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.



